- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कांद्याचे भाव भडकल्यानंतर केंद्र सरकारने भाव खाली आणण्यासाठी आमच्याकडे ४६ हजार मेट्रिक टन कांद्याचा साठा असल्याचे सांगितले. या शिवाय गरज भासल्यास साठ्याची मर्यादा ठरवून दिली जाईल, असेही म्हटले.प्रश्न हा आहे की कांद्याचा पुरेसा साठा असताना आणि साठ्याची मर्यादा योजना असूनही भाव का भडकले? याचे कारण हे सांगितले जाते की गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांद्याचा योग्य भाव न मिळाल्यामुळे तो त्यांनी रस्त्यांवर फेकला होता. एका कांदा व्यापाºयाने तर आपला कांदा विकून आलेले पैसे पंतप्रधान निधीला पाठवले होते. येत्या २१ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहे.या परिस्थितीत साठवून ठेवलेला कांदा बाहेर काढून केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेऊ इच्छित नाही. परिणामी निवडणुकीत कांदा लोकांना रडवतो आहे. किरकोळ विक्रीत कांद्याचा भाव ७० ते ८० रूपये झाल्यामुळे लोक त्रासले आहेत.केंद्र याबद्दल काय करणार असे विचारले असता केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले की, मदर डेअरी आणि नाफेड बूथ्सवर कांदा नियंत्रित दराने विकत आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत कांद्याच्या आवकीवर पाऊस, पुराचा परिणाम होत असतो. नोव्हेंबरअखेरपर्यंत मंडीत कांद्याचे नवे पीक आल्यावर भाव आपोआप नियंत्रित होतील.पासवान म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकºयांच्या कांद्याला चांगला भाव मिळतो आहे ही चांगली बाब आहे.लासलगावात ४४ ते ५0 रु.कि.दिल्लीत आझादपूर मंडीत कांद्याचा घाऊक विक्रीचा भाव २०१५ नंतर सर्वात जास्त म्हणजे ५० रुपये किलो झाला होता.महाराष्ट्रातील लासलगावात अशियातील सगळ्यात मोठी कांदा बाजारपेठ असून सोमवारी तेथे कांदा ४४ ते ५० रुपये किलो विकला गेला.व्यावसायिकांचे म्हणणे असे की, विक्रीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे त्याचा भाव वाढला आहे.आझादपूर मंडीत ओनियन मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी शुक्रवारी कांद्याची आवक १,०२६ टन होती तर दिल्लीत रोजचा खप सुमारे तीन हजार टन आहे.
केंद्र सरकारकडे कांद्याचा ४६ हजार टन साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 2:33 AM