- शीलेश शर्मा नवी दिल्ली : केंद्र सरकारने गैरसमजात राहू नये, असा इशारा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. सरकार शेतकऱ्यांची शक्ती कमी समजत आहे. ते म्हणाले, जोपर्यंत सरकार तिन्ही कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सीताराम येचुरी, डी. राजा आणि टी. के. एस. एलोंगोवान यांच्यासोबत बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर गांधी बोलत होते.रामनाथ कोविंद यांना या नेत्यांनी निवेदन देऊन वस्तुस्थिती सांगितली. ते म्हणाले, सरकारने चर्चेविना, अलोकशाही मार्गांनी कृषी कायदे संमत केले. ते परत घेतले जावेत. शरद पवार यांचा तर्क होता की, विधेयक संमत करायच्या आधी सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. ते निवड समितीकडे पाठवायला हवे होते. तत्पूर्वी, या सर्व नेत्यांनी आपापसात पुढील धोरणावर विचार केला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी नेत्यांशी स्वतंत्रपणे झालेली भेट आणि चर्चेच्या आधारावर हा निर्णय घेतला की, सरकार कायदे परत घेण्यास अगतिक होईल तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र केले जावे. यादरम्यान शरद पवार यांनी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल आणि प्रेमचंदू माजरा यांचीही भेट घेतली. शेतकऱ्यांच्या आंदोलनास अधिक तीव्र करण्याच्या रणनीतीबाबत भेट होती.
भांडवलदारांसाठी बनवले कायदेसीताराम येचुरी यांनी आरोप केला की, हे शेतकरीविरोधी कायदे भांडवलदारांच्या मदतीसाठी बनवले गेले आहेत. ते ताबडतोब रद्द झाले पाहिजेत. या नेत्यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीसह रस्त्यांवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती कोविंद यांना दिली.