संसदेच्या आगामी सत्रासाठी केंद्र सरकारने मागितली काँग्रेसकडे मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 11:03 IST2019-06-06T10:59:59+5:302019-06-06T11:03:02+5:30
मेघवाल आणि मुरलीधरन यांनी राज्यसभेतील विरोधीपक्षनेते आझाद यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंत्र्यांनी रमजान ईदनिमित्त आझाद यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी संसदेच्या सत्रात केंद्र सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली.

संसदेच्या आगामी सत्रासाठी केंद्र सरकारने मागितली काँग्रेसकडे मदत
नवी दिल्ली - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने १७ जूनपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या सत्रासाठी विरोधीपक्ष काँग्रेसकडे मदत मागितली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आपल्या मंत्रालयातील दोन राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन यांना काँग्रेसनेते आणि राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाब नबी आझाद यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते.
मेघवाल आणि मुरलीधरन यांनी राज्यसभेतील विरोधीपक्षनेते आझाद यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंत्र्यांनी रमजान ईदनिमित्त आझाद यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी संसदेचे सत्र शांततेत पार पडावे यासाठी केंद्र सरकारला सहकार्य करण्याची विनंती आझाद यांच्याकडे करण्यात आली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या सत्राच्या पार्श्वभूमीवर संसदेत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संसदेच्या सत्रात सर्वच राजकीय पक्षांना सहकार्य करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. पहिल्या दोन दिवसात खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर १९ जून रोजी अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्यांनतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद २० जून रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची संयुक्त बैठक घेणार आहे.
सतराव्या लोकसभेचे पहिले संसदीय सत्र १७ जून पासून २६ जुलैपर्यंत चालणार आहे. यामध्ये १९ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. तर ५ जुलै रोजी बजेट सादर करण्यात येणार आहे. एकूण ३० दिवसांच्या सत्रात ४ जुलै रोजी आर्थिक सर्वेक्षण मांडण्यात येईल. त्यानंतर ५ जून रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करतील. याआधी फेब्रुवारीमध्ये पियुष गोयल यांनी सरकारचे अंतिम बजेट सादर केले होते.