गांधीनगर : दहा लाख लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गुजरात सरकारने शनिवारी आयोजिलेल्या रोजगार मेळाव्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलेल्या भाषणात ते म्हणाले की, केंद्र सरकार युवकांसाठी शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण यापुढील काळात वाढविणार आहे.
गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र उमेदवारांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया तेथील राज्य सरकारने अधिक वेगवान केली आहे. गुजरातमधील रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी राष्ट्रीय स्तरावर आयोजिण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये ७५ हजार पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. अशा प्रकारचे रोजगार मेळावे यापुढेही राष्ट्रीय व राज्य पातळीवर आयोजिण्यात येणार आहेत. गुुजरात सरकारने राबविलेल्या नव्याऔद्योगिक धोरणामुळे रोजगाराच्या प्रमाणात वाढ झाली, असेही मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)
टाटा-एअरबस प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन
लष्करी मालवाहतुकीसाठी उपयोगी ठरणाऱ्या सी २९५ प्रकारच्या विमानांचे उत्पादन करण्यासाठी गुजरातमध्ये सुरू होणाऱ्या टाटा-एअरबस प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (रविवारी) होणार आहे. अशा विमानांची निर्मिती करण्याची क्षमता फक्त १२ देशांमध्ये आहे. त्यांच्या पंक्तीत भारताचा भविष्यात समावेश होणार आहे. टाटा-एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून गुजरातमध्ये नेण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली होती.