बंगळुरू - जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करून राज्याचे दोन भागात विभाजन करण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकारकडून काश्मीरमध्ये अजून एक मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. काश्मीर खोऱ्यातील अनेक वर्षांपासून बंद असलेली सुमारे 50 हजार मंदिरे पुन्हा उघडण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. काश्मीर खोऱ्यात अनेक वर्षांपासून बंद असलेल्या मंदिरांचे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. जी. किशन रेड्डी काश्मीर खोऱ्यातील बंद मंदिरांबाबत म्हणाले की, ''आम्ही काश्मीर खोऱ्यात बंद पडलेल्या शाळांचा सर्वे करण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे, या शाळा पुन्हा सुरू करण्यात येतील. तसेच गेल्या काही वर्षांपासून काश्मीर खोऱ्यातील सुमारे 50 हजार मंदिरे बंद अवस्थेत आहेत. ज्यातील काही मंदिरे नष्ट झाली आहेत, तेथील मूर्ती भग्नावस्थेत आहेत, अशा मंदिरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.'' 90 च्या दशकात काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नंगानाच सुरू झाला होता. त्यानंतर लाखो काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून परागंदा व्हावे लागले होते. या काळात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या केल्या होत्या. तसेच अनेक मंदिरांचीही मोडतोड केली होती. काश्मिरी पंडितांच्या पलायनानंतर अनेक मंदिरे बंद पडली होती. त्यामध्ये काही प्रसिद्ध मंदिरांचाही समावेश आहे.
केंद्र सरकार उघडणार काश्मीर खोऱ्यातील बंद असलेल्या 50 हजार मंदिरांचे दरवाजे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 3:31 PM