विमान प्रवास महागडा असल्य़ाने अनेकदा वेळखाऊ असलेल्या रेल्वे, बस प्रवासाला प्राधान्य दिले जाते. वयोवृद्धांना यामध्ये निम्मे तिकिट आकारले जात असले तरीही विमान प्रवास करायचा असल्यास पूर्ण पैसेच द्यावे लागतात. मात्र, आता देशातील ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे.
देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला आता एअर इंडियाचे तिकिट निम्म्या दरात मिळणार आहे. विमानोड्डाण मंत्रालयाने बुधवारी याची माहिती दिली आहे. एअर इंडियाच्या वेबसाईटवरही याची माहिती दिलेली आहे. मात्र, यासाठी काही अटी असणार आहेत.
योजनेतील अटी...- प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाकडे भारतीय नागरिकत्व हवे. भारतात स्थायिक असलेल्या नागरिकांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवे.- इकॉनॉमी केबिनमध्ये बुकिंग श्रेणीच्या मूळ भाड्याचे ५० टक्के - भारतात कोणत्याही सेक्टरच्या प्रवासासाठी लागू- तिकिट जारी केल्याच्या १ वर्ष मुदतीसाठी लागू - प्रवासाच्या सात दिवस आधी बुकिंग करावे लागेल
एअर इंडियाकडून ही स्कीम या आधीही देण्यात येत होती. मात्र, आता याला मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. एअर इंडियाला सरकार खासगी कंपन्यांना देण्याच्या प्रयत्नात आहे. टाटा ग्रुप पुन्हा एकदा एअर इंडिया चालवू शकतो, अशा बातम्या आल्या होत्या. टाटा ग्रुपनेच यासाठी अर्ज केला आहे. एअर एशियात टाटा ग्रुपचा मोठा हिस्सा आहे.
१९५३ नंतर पुन्हा एअर इंडियाची सूत्रे टाटांकडे येण्याची चिन्हे
मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत असंख्य क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या टाटा उद्योगसमूहाने सरकारी हवाई वाहतूक कंपनी ‘एअर इंडिया’च्या अधिग्रहणासाठी ‘इरादापत्र’ सादर केले असून, हे अधिग्रहण यशस्वी झाल्यास टाटा समूह १९५३ नंतर प्रथमच एअर इंडियाच्या कॉकपीटमध्ये प्रवेश करील. टाटा समूह ‘एअर इंडिया’च्या अधिग्रहणाचा गंभीरपणे विचार करीत असून, १४ डिसेंबरला विहित मुदतीपूर्वीच आपली निविदा सादर करणार असल्याचे वृत्त कित्येक माध्यमांनी दिले आहे. भारत सरकारने जानेवारीमध्ये एअर इंडियासाठी निविदा मागविल्या होत्या. एअर इंडियातील १०० टक्के हिस्सेदारी सरकार विकणार आहे. त्यासोबतच उपकंपनी ‘इंडियन एक्स्पेस’मधील १०० टक्के हिस्सेदारी आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि.मधील ५० टक्के हिस्सेदारीही विकण्यात येणार आहे.प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाकरिता इरादापत्र सादर करण्यासाठी टाटा समूहाने मलेशियाच्या एअर एशिया समूहासोबतच्या आपल्या भागीदारीतील उद्यमाचा वापर केला आहे. टाटा समूह एअर एशियामधील आपली हिस्सेदारी हळूहळू वाढवून २०२०-२१ अखेरपर्यंत ७६ टक्क्यांच्या वर नेणार असल्याचे वृत्त आहे. २०१८ मध्ये सरकारने एअर इंडिया विकायला काढली होती. मुदतवाढ देऊनही तेव्हा एकही निविदा प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे आता सरकारने सर्व १०० टक्के हिस्सेदारी विकायला काढली आहे. खरेदीदार मिळावेत यासाठी सरकारने एअर इंडियाचे कर्ज ६२ हजार कोटींवरून २३,२८६ कोटींवर आणले आहे.