नवी दिल्ली : नवे वर्ष सुरू व्हायला जेमतेम ३५ दिवस शिल्लक आहेत. नव्या वर्षात किती सुट्ट्या मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. २०२२ मध्ये एकूण ४२ सरकारी सुट्ट्या राहणार आहेत. अनेक जण सुट्ट्या पाहून फिरण्याचे किंवा इतर कार्यक्रमांचे नियाेजन आखतात. त्यामुळे पुढील वर्षातील सुट्टीचे कॅलेंडर पाहूनच नियाेजन करू शकतात. नव्या वर्षात ४२ पैकी १८ गॅझेटेड सुट्ट्या राहणार आहेत. उर्वरित रिस्ट्रिक्टेड सुट्ट्या राहतील. या अशा सुट्ट्या असतात ज्यांचा निर्णय संस्था किंवा कंपनी घेते. शनिवार आणि रविवारमुळे नव्या वर्षात अनेक सुट्ट्या बुडणार आहेत. २०२२ च्या कॅलेंडरवर नजर टाकल्यास हे लक्षात येईल. काही सुट्ट्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असतात. राज्यांकडूनही सुट्ट्यांचे कॅलेंडर जारी केले जाते. त्यातून संबंधित राज्यांमधील सुट्ट्यांची माहिती मिळते. डिसेंबरमध्ये राज्यांकडून हे कॅलेंडर जारी हाेण्याची शक्यता आहे.
या सुट्ट्या आहेत शनिवार आणि रविवारीअनेक ठिकाणी वसंत पंचमी आणि दयानंद सरस्वती जयंतीची सुट्टी देण्यात येते. दाेन्ही दिवस शनिवारी आले आहेत. वसंत पंचमी ५ फेब्रुवारी आणि दयानंद सरस्वती जयंती २६ फेब्रुवारीला आहे. त्यामुळे या सट्ट्या बुडाल्या आहेत. तर पारसी नववर्ष २० मार्चला रविवारी आहे. तर गुढीपाडवा २ एप्रिलला रविवारी आहे. इस्टर संडे १७ एप्रिलला आहे. १ मे राेजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनही रविवारीच येत आहे. १० जुलैला बकरी ईद रविवारीच आहे. याशिवाय ऑक्टाेबरमध्ये २ तारखेला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, ९ ऑक्टाेबरला महर्षी वाल्मीकी जयंती आणि ३० ऑक्टाेबरला छटपूजा हे शनिवारी येत आहेत. तर ८ ऑक्टाेबरला रविवारी मिलाद उद-नबी आहे. ख्रिसमसची २५ डिसेंबरची सुट्टीही रविवार असल्याने बुडाली आहे.