नवी दिल्लीः इंधनाचे रोज वाढणारे दर आणि सर्वसामान्यांना बसणारे महागाईचे चटके यावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केला आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफवरील व्याजदरात वाढ करून त्यांनी नोकरदारांना दिलासा दिला आहे, तर किसान विकास पत्रांवरील व्याजदर वाढवून सामान्य गुंतवणूकदारांना खूश केलंय.
पीपीएफवर सध्या ७.६ टक्के दराने व्याज दिलं जातं. ते यापुढे ८ टक्क्याने मिळेल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. त्यासोबतच, सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदर ८.१ टक्क्यांवरून ८.५ टक्के करण्यात आल्याचंही जाहीर केलं. छोट्या गुंतवणूकदारांना वर्षानुवर्षं साथ देणाऱ्या किसान विकास पत्रांवर यापुढे ७.३ टक्क्यांऐवजी ७.७ टक्के व्याज मिळणार आहे. हे नवे व्याजदर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी आहेत.
पाच वर्षांसाठीची मुदत ठेव योजना, रिकरिंग डिपॉझिट आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील नवे व्याजदर अनुक्रमे ७.८ टक्के, ७.३ टक्के आणि ८.७ टक्के असे आहेत. पीपीएफप्रमाणेच राष्ट्रीय बचत योजनेतील रकमेवरही ८ टक्के दराने व्याज दिलं जाणार आहे.