देशात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third wave) येण्याचे संकेत दिसू लागले आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी तयारी सुरु केली असून फ्रंट वर्कर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनो लसीचा बुस्टर डोस (Booster Dose) देण्यावर विचार सुरु करण्यात आला आहे. केंद्र सरकार लवकरच यावर अंतिम निर्णय घेणार आहे. (Health workers may get corona vaccine booster dose soon.)
मेडिकल जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या अनेक देशांच्या वैज्ञानिकांनी एका संयुक्त अभ्यासात म्हटले होते की, कोरोना लस घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटमुळे संक्रमित होत आहेत. अधिकतर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दुसऱ्यांदा कोरोना झाल्यावर गंभीर लक्षणे दिसली नाहीत. मात्र, त्यांना आयसोलेशनमध्ये जावे लागले आहे. या अभ्यासात सहभागी झालेल्या दिल्लीतील आयजीआयबीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, या परिस्थितीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमधील ही संभाव्य कमतरता रोखण्यासाठी लवकरात लवकर बुस्टर डोस देणे गरजेचे आहे.
दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार बुस्टर डोसवर संशोधन कमी असल्यामुळे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर)ची एक टीम काम करत आहे. लसीकरणासाठी गठीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या एका सदस्याने सांगितले की, कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिनच्या बुस्टर डोसची चर्चा सुरु आहे. संशोधनानंतर देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या दुसऱ्या डोसला सहा महिने झाल्यावर बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
७० कोटी लसीकरणदेशात आतापर्यंत कोरोनाच्या लसींचे ७० कोटी डोस दिले गेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी ट्विट करून याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 10 कोटी डोस केवळ 13 दिवसांच दिले गेले आहेत. तर पहिले 10 कोटी डोस देण्यासाठी 85 दिवस लागले होते.