नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. काल दिवसभरात देशात १३ हजारांहून कमी रुग्ण आढळून आले. त्यामुळे देश लवकरच कोरोना संकटातून बाहेर पडू लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यातच आता कोरोना लसीकरणाची तयारीदेखील वेगानं सुरू झाली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून देशातल्या विविध राज्यांमध्ये कोरोनाची लस पाठवली गेली आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्सना कोरोनावरील लस देण्यात येईल. त्यानंतर पन्नाशी पार केलेल्या, गंभीर आजारांचा सामना करत असलेल्यांना लस टोचण्यात येईल. सध्याच्या घडीला सीरमच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. दोन्ही लसी भारतातच तयार झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांनादेखील याच लसी मिळतील.
Corona Vaccine: कोविशिल्ड की कोवॅक्सिन? सर्वसामान्यांना लस निवडता येणार?; जाणून घ्या...
By कुणाल गवाणकर | Published: January 12, 2021 5:26 PM