नवी दिल्ली : एकीकडे भारत आणि चीन यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे, तर दुसरीकडे याच मुद्द्यावर भाजपा आणि काँग्रेस यांच्यातही राजकीय द्वंद्व सुरू आहे. लडाखमध्ये एलएसीवर चिनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. तेव्हापासून काँग्रेसभाजपावर सातत्याने हल्ला चढवत आहे.
गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारताच्या प्रतिक्रियेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढेच नाही, तर राहुल गांधी यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींचा उल्लेख “Surender Modi” असाही केला होता. याच मुद्द्यावर आता केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी, राहुल गांधींवर पलटवर केला आहे. आम्ही चर्चेला घाबरत नाही, चर्चा करायचीच असेल तर या, संसदेत चर्चा करू, 1962पासून ते आजपर्यंत दोन-दोन हात होऊन जाऊ द्या, असे शाह यांनी म्हटले आहे.
एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत शाह म्हणाले चर्चेला कुणीही घाबरत नाही. मात्र, देशाचे जवान जेव्हा संघर्ष करत आहेत, सरकार निश्चित भूमिका घेऊन योग्य प्रकारे पावले टाकत आहे, तेव्हा पाकिस्तान आणि चीनला खूश करणारी वक्तव्य करणे योग्य नाही.
कोरोना आणि लडाखमधील गलवान खोऱ्यातील चीनशी सुरू असलेल्या तणावावर प्रश्न विचारण्यात आला असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व भारत दोन्ही युद्ध जिंकत आहे, असे अमित शाह म्हणाले.
शाह म्हणाले, भारत सरकारने कोरोना विरोधात चांगल्या पद्धतीने काम केले आहे. मी राहुल गांधींना सल्ला देऊ शकत नाही. हे काम त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे आहे. काही लोक 'वक्रद्रष्टे' आहेत, त्यांना चांगल्या गोष्टींमध्येही वाईटच दिसते. भारताने कोरोना विरोधात चांगला संघर्ष केला आहे. जगाच्या तुलनेत आपले आकडे फार चांगले आहेत.
गलवान, पेंगाँगनंतर आता देपसांगवर चीनचा डोळा, नवा वाद उकरून काढण्याच्या तयारीत ड्रॅगन
यावेळी शाह यांनी आणीबाणीवरही भाष्य करत काँग्रेसवर हल्ला चढवला. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून रोजी आणीबाणी जाहीर करून देशातील लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचे काम केले. हा कुठल्याही पक्षावरील हल्ला नव्हता, तर देशाच्या लोकशाहीवर केलेला हल्ला होता. असे शहा म्हणाले.
India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'