नवी दिल्ली : नवी दिल्लीविमानतळावरून तब्बल ९३ लाख रूपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून ९३ लाख रुपये किमतीचे १५९७ ग्रॅम सोने पेस्ट स्वरूपात जप्त केले. या प्रवाशाची ओळख पटली असून करीबिल हक असे त्याचे नाव आहे, तो भारतीय नागरिक असून एअर इंडियाच्या विमानाने दुबईहून आला होता.
२ दिवसांपूर्वी ५८ लाखांचे सोने जप्तदोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ किलोहून अधिक सोन्याची तस्करी झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी एका परदेशी नागरिकासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ५८ लाख रुपये आहे. दुबईहून आलेल्या नागरिकाविरुद्ध १२ जून रोजी या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्याच दिवशी बँकॉक येथे परत जाण्याची योजना आखली होती. सीमाशुल्क विभागाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, तपासादरम्यान विस्तारा या विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याला पेस्टच्या स्वरूपात सोने देऊन त्याने सोन्याची तस्करी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ५७.६५ लाख रुपये किमतीचे एकूण १.१२ किलो सोने जप्त करण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सोने जप्त करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.