Chirag Paswan on Kangana Ranaut : भाजप खासदार कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनावरुन केलेल्या वक्तव्यावरुन सध्या जोरदार चर्चेत आहे. भाजपच्या तिकिटावर कंगना रणौत हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आली आहे. मात्र शेतकरी आंदोलनातील महिलांबाबत केलेल्या विधानावरुन गोंधळ उडाला आहे. भाजपनेही कंगनाला या विधानावरुन झापलं आहे. कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणावर बोलण्याचा अधिकार नाही, असं स्पष्टीकरण भाजपने दिलं. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी कंगनाच्या विधानावर भाष्य केलं आहे.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार होत असल्याचे खासदार कंगनाने म्हटलं. शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते, असे कंगनाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. कंगनाच्या या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ उडाला.
शेतकरी आंदोलनाबाबत कंगना रणौतने केलेल्या विचित्र विधानाने तिच्यावर सर्वत्र टीका होत आहे. कंगनाचा पक्ष भाजपनेही तिच्या वक्तव्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. कंगना केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचीही चांगली मैत्रीण आहे. आता चिराग यांनी तिच्या मैणित्राच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"नक्कीच कंगना माझी चांगली मैत्रिण आहे आणि माझा विश्वास आहे की ती एक मजबूत इच्छाशक्ती असलेली महिला देखील आहे. कंगनाचे स्वतःचे विचार आहेत आणि ती व्यक्त करण्यास कधीही संकोच करत नाही. तिच्या विचाराशी कोणी सहमत किंवा असहमत असू शकते. पण आज राजकारणाच्या दुनियेत असताना तिने विचार करायला हवा. पण, मी यात हस्तक्षेप करणार नाही. हा भारतीय जनता पक्षाचा स्वतःचा विषय आहे," असं चिराग पासवानने म्हटलं आहे.
दरम्यान, कंगना रणौतने केलेल्या विधानावरुन गोंधळ उडालेला असताना भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने कंगना रणौतच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे. कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा अधिकारही नाही आणि परवानगीही नाही, असं भाजपने निवेदन जारी करत म्हटलं आहे.