मुझफ्फरपूर : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यास केंद्र सरकारलाही अपयश आलेलं आहे. वाढत्या कांद्याच्या दरामुळे सामान्य नागरिक पुरता त्रासलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बिहारमधल्या मुझफ्फरपूरमधील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे एका व्यक्तीनं फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर 12 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. राजू नय्यर नामक व्यक्तीनं पासवान यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली असून, त्याआधारे कलम 420 (फसवणूक), 506 (धमकावणे), 379 (चोरी) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नय्यर यांनी तक्रारीत पासवान यांच्या दाव्याचा उल्लेख करत फसवणुकीचा आरोप लावला आहे. कांद्याच्या काळ्या बाजारामुळेच तुटवडा भासत असल्याचा दावा पासवान यांनी केला. हा दावा म्हणजे जनतेची दिशाभूल असल्याचं ते म्हणाले आहेत. कांद्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. तरीही सरकार त्यावर उपाययोजना न करता फसवणूक करत आहे, असा आरोप नय्यर यांनी तक्रारीत केला आहे.
कांद्याच्या दरवाढी प्रकरणात केंद्रीय मंत्री पासवानांविरुद्ध फसवणुकीची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 10:15 PM