मुंबई: समाज, संस्कृती, साहित्य, नाट्य अशा प्रतिभा आणि कलेच्या क्षेत्रांत निर्मोही व व्रतस्थपणे काम करणाऱ्या गिरीश कर्नाड यांची उणीव नेहमीच जाणवेल, अशा शब्दांत केंद्रीय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी कर्नाड यांना श्रद्धांजली वाहिली. कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचं आज सकाळी प्रदीर्घ आजारानं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं. अभिनय आणि साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊन आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या गिरीश कर्नाड यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आदरांजली वाहिली. 'ज्येष्ठ अभिनेते, लेखक, नाटककार डॉ. गिरीश कर्नाड यांच्या निधनानं भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडीतील एक भाष्यकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमीच्या क्षेत्रात मोलाचं योगदान देत असतानाच कर्नाड यांनी आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली. ते प्रख्यात विचारवंत आणि प्रतिभावंत लेखक होते. त्यांची ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटातील भूमिका कायम लक्षात राहणारी आहे. ‘मेरी जंग’ या हिंदी सिनेमात त्यांची भूमिका अतिशय छोटी होती. परंतु सत्याशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहणारा आणि त्यासाठी निश्चलपणे फासावर चढणारा ‘दीपक वर्मा’ हा माणूस कर्नाड यांनी आपल्या संयत अभिनयाने अमर केला. आजारी असताना शेवटच्या काळात ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातील कर्नाड यांची भूमिकाही लक्षात राहणारी आहे. समाज, संस्कृती, साहित्य, नाट्य अशा प्रतिभा आणि कलेच्या क्षेत्रांत निर्मोही व व्रतस्थपणे काम करणाऱ्या या प्रतिभावंताची उणीव नेहमीच जाणवणार आहे', अशा शब्दांत गडकरींनी कर्नाड यांना श्रद्धांजली अर्पित केली.
या भाष्यकाराची उणीव नेहमीच जाणवेल; गिरीश कर्नाड यांना गडकरींची श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 11:06 PM