राजकीय विषयांवरही स्पष्टपणे भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2024 मध्ये पूर्वीपेक्षाही अधिक जागांसह सरकार येईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 300 हून अधिक जागा मिळवत बहुमताचे सरकार स्थापन केले होते.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाष्य करत, येथेही भाजपचाच विजय होईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे. मात्र, तेलंगणा निवडणुकीसंदर्भात त्यांनी असा दावा केला नाही. पण आम्ही तेथे एक मजबूत पक्ष म्हणून उदयास येऊ, आमची ताकद पूर्वीपेक्षा अधिक असेल, असे गडकरी म्हणाले.
मोफतचे राजकारण लोकशाहीसाठी घातक -एएनआयसोबत बोलताना गडकरी म्हणाले, 'आम्हाला लोकसभा निवडणुकीत पूर्वीपेक्षाही अधिक जागा मिळतील. आम्ही देशाचे भविष्य सुधारले असून जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्हाला पुन्हा एकदा विजयी करणार आहे. याचवेळी गडकरी यांनी, मोफतच्या विजेसह फुकटच्या योजनाही अयोग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, वीज कंपन्या 18 लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसत आहेत. हे असेच चालू राहिले तर आपले ऊर्जा क्षेत्रच नष्ट होईल. निवडणुका जिंकायच्या असतील तर गरिबांसाठी घरे बांधा आणि त्यांना रोजगार द्या. आपण जनतेला एखादी गोष्ट फुकट दिली, तर त्याचे महत्त्व कमी होते. हे मोफतचे राजकारण लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.'
काँग्रेसने 60 वर्षात केले नव्हते, ते आम्ही 10 वर्षांत केले - विरोधी पक्ष आणि परदेशातील माध्यमे भारतातील लोकशाही धोक्यात आल्याचे सांगत आहेत, यावर बोलताना गडकरी म्हणाले, तसे नाही. कोणतीही व्यवस्था आपल्या कायद्याने चालते, जेव्हा काही लोक कायद्यासमोर अपयशी ठरतात, तेव्हा ते असे आरोप करतात. जे काम काँग्रेसने 60 वर्षात केले नव्हते, ते काम आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षात केले आहे, असेही ते म्हणाले.