भोपाळ: सुमारे ७० वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्ते भारतात पाहायला मिळणार आहे. अलीकडेच नामिबिया देशातून ८ चित्ते भारतात आणण्यात आले. मोठ्या जल्लोषात चित्त्यांचे स्वागतही करण्यात आले. चित्ते भारतात आणण्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकाही केली आहे. मात्र, यानंतर आता मोदी सरकार चित्त्यांचे नामकरण करणार असल्याचे सांगितले जात आहे. पैकी एक नाव खुद्द पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी एक खास नाव सुचवल्याचे सांगितले जात आहे.
नामिबियातून खास तयार करण्यात आलेल्या लाकडी पेटीतून १० तासांचा प्रवास करत चित्ते भारतात दाखल झाले. तर हवाई तळावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना हेलिकॉप्टरमधून नेऊन त्यांचा राष्ट्रीय उद्यानापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. संपूर्ण प्रवासामध्ये चित्त्यांना खाण्यास काहीही देण्यात आले नव्हते. राष्ट्रीय उद्यानात आणल्यानंतरच त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी यावेळी तीन चित्त्यांना पिंजऱ्यातून मुक्त केले. यानंतर आता चित्त्यांचे नामकरण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय नाव ठेवलेय?
चित्त्यांना त्यांच्या अधिवासात सोडल्यानंतर सुरुवातलीला ते थोडे विचलित झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा व्यवहार व वागणे सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. आता या आठही चित्त्यांची नावे ठेवण्यात आली आहेत. ओबान, फ्रेडी, सावन्नाह, आशा, सिबली, सैसा आणि साशा असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. त्यातील ‘आशा’ हे मादी चित्त्याचे नाव पंतप्रधान मोदी यांनी ठेवले आहे. तर, इतर चित्त्यांची नाव नामीबिया येथेच ठेवण्यात आली होती.
दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रोजेक्ट चित्तावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्ता भारतात आणण्यासाठी पूर्वीच्या सरकारांनी विधायक प्रयत्न केले नसल्याच्या आरोपांवर ते विकृत खोटारडे असल्याचे म्हटले. तसेच एक पत्र शेअर करत, हे ते पत्र आहे ज्याद्वारे सन २००९मध्ये 'प्रोजेक्ट चित्ता' सुरू झाला होता. 'भारत जोडो यात्रे'मध्ये व्यग्र असल्याने मला हे पत्र देता आले नाही, असे सांगत मोदी सरकावर टीकास्त्र सोडले.
-