नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने देशातील विविध स्तरांवरील नागरिकांसाठी नाना प्रकारच्या योजना आणल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही मोठ्या प्रमाणात झाल्याचा दावा करण्यात येतो. यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. (PM kisan Samman nidhi Yojana) या योजनेअंतर्गत अनेक अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते झाले आहेत जे या योजनेसाठी अपात्र आहेत. केंद्र सरकार आता अशा सर्व शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याच्या तयारीत आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार यासंबंधी केंद्र सरकारने काही नियम आखले आहेत. पीटीआयने दिलेल्या एका वृत्तानुसार, यानंतरही जवळपास ४३५० कोटी रुपये अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना अशा अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
अपात्र शेतकऱ्यांनीही लाभ घेतल्याचे उघडकीस
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केलेले असे अनेक शेतकरीदेखील आहेत, जे आयकर भरतात आणि सोबतच सन्मान निधी योजनेचाही लाभ घेतात. केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. २००० प्रमाणे तीन हफ्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. हे पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
दरम्यान, देशातील राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश मार्गदर्शक तत्त्वांनुसार आर्थिक मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबांची यादी तयार करतात. शेतकरी कुटुंब म्हणजे यामध्ये पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. जास्त उत्पन्न असलेल्या शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतात.