लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जातीय हिंसाचार उफाळलेल्या सहारनपूूरमध्ये केंद्राने ४०० दंगलकाबू पोलीस कर्मचारी पाठविले आहेत. हे पथक या भागात शांतता प्रस्थापित करण्यात उत्तर प्रदेश सरकारला मदत करणार आहे. दरम्यान, बुधवारी एका समुदायातील युवकाच्या हत्येनंतर आज गुरुवारी दुसऱ्या समुदायातील एका युवकावर गोळीबाराची घटना घडली. या युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहारनपूर जिल्ह्यातील हिंसाचारात दोन जणांचा बळी गेला असून, ४० लोक जखमी झाले आहेत. राज्य सरकारच्या विनंतीनंतर केंद्राने दंगलकाबू पोलीस पथक रवाना केले. राज्य सरकारने हिंसाचाराच्या घटनांबाबत प्राथमिक अहवालही केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठविला आहे. गृह मंत्रालयाने सहारनपूरमधील घटनांबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला होता. राज्य सरकारच्या विनंतीनंतर सहारनपूरला शीघ्र कृती दलाच्या (आरएएफ) चार कंपन्या (जवळपास ४०० जवान) पाठविण्यात आल्या आहेत. हे कर्मचारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला मदत करतील, असे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अशोक प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले.
सहारनपूरमध्ये केंद्रीय सुरक्षा दले
By admin | Published: May 26, 2017 1:10 AM