Central Vista Project: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी इंडिया गेट येथे स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhashchandra Bose) यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 23 जानेवारी रोजी पराक्रम दिनी नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण याच ठिकाणी करण्यात आले होते. आता या ठिकाणी 28 फूट उंचीचा ग्रॅनाईटचा पुतळा बसवण्यात आला आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा पुतळा म्हणजे, नेताजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाला श्रद्धांजली आणि राष्ट्राच्या त्यांच्या ऋणाचे प्रतीक आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी सांगितले की, 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी सेंट्रल व्हिस्टाच्या पुनर्विकास प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्व लोकांना आमंत्रित केले जाणार आहे.
नेताजींचा पुतळा अरुण योगीराज यांनी बनवला आहे. त्यांनी तयार केलेला 28 फूट उंचीचा पुतळा एकाच ग्रॅनाइट दगडात कोरलेला असून त्याचे वजन सुमारे 65 मेट्रिक टन आहे. नेतातींच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूचे (राजपथ) उद्घाटन कले. आता हा मार्ग 'कर्तव्यपथ' म्हणून ओळखला जाणार आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वेगवेगळ्या व्यासपीठावर मानाचे स्थान दिले जात आहे. नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण आणि कर्तव्य पथ हे आझादीच्या अमृत महोत्सवाच्या काळातले मोठे पाऊल आहे.