नरेंद्र मोदी सरकारकडून सत्तेचे केंद्रीकरण; राहुल गांधी यांनी केला पुन्हा जबर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 01:04 AM2020-07-07T01:04:19+5:302020-07-07T01:04:54+5:30
राहुल गांधी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, ‘अपयशी अंमलबजावणी’च्या ‘केस स्टडीज’साठी ‘एचएसबीसी’मधील भविष्यकालीन विषय : १. कोविड-१९, २. नोटाबंदी, ३. जीएसटी अंमलबजावणी.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने निशाणा साधला आहे. त्यांनी एका टष्ट्वीटमध्ये ‘हॉर्वर्ड बिझनेस स्कूल’मधील (एचएसबीसी) भविष्यकालीन ‘अपयशी अंमलबजावणी’चे तीन विषय म्हणून कोविड-१९ विषाणू साथ, नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणी यांचा उल्लेख केला आहे.
राहुल गांधी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, ‘अपयशी अंमलबजावणी’च्या ‘केस स्टडीज’साठी ‘एचएसबीसी’मधील भविष्यकालीन विषय : १. कोविड-१९, २. नोटाबंदी, ३. जीएसटी अंमलबजावणी. राहुल गांधी यांनी आपल्या टष्ट्वीटसोबत नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ जोडला आहे. या व्हिडिओत मोदी म्हणतात की, ‘महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते. कोरोनाचे युद्ध आपण २१ दिवसांत जिंकू.’ मोदी भाषण करीत असतानाच व्हिडिओवर भारतातील कोरोना रुग्णांचा आलेख ‘सुपर इम्पोज’ होऊन वर चढत जाताना दिसतो. मोदीच्या भाषणाची क्लिप संपताना हा आलेख कोरोनाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानी आल्याचे दर्शवितो. कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणार असल्याचे सांगत असतानाच मोदी ‘थाळ्या वाजवून, टाळ्या वाजवून, घंटी वाजवून, मेणबत्त्या-दिवे पेटवून अथवा मोबाईलचा लाईट लावून’ असे वक्तव्य करताना दिसतात.
कोरोनाविरोधातील लढाईत टाळ्या-थाळ्या वाजविणे आणि दिवे पेटविण्याच्या मोदींच्या आवाहनावर याआधीच चोहोबाजूंनी मोठी टीका झालेली आहे.
कोविड-१९ च्या हाताळणीबाबत मोदी सरकारवर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच टीका करीत आहे. मोदी सरकारच्या धोरणांची तुलना त्यांच्याकडून पाश्चात्त्य देशांशी करण्यात आली. कोरोना संकटाबाबत राहुल गांधी यांनी बुद्धिजीवी नागरिकांशी चर्चा केली आहे. कोविड-१ चे निमित्त साधून मोदी यांनी सत्तेचे केंद्रीकरण केल्याची टीका, राहुल गांधी यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूर आणि गरीब लोक यांच्या झालेल्या हालावरूनही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.
देशातील कोविड-१९ रुग्णांची संख्या गेल्या महिन्यात पाच लाखांच्या पुढे गेली तेव्हा राहुल गांधी म्हटले होते की, ‘मोदी सरकार कोविड-१९ साथीविरुद्ध लढायचे नाकारत आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ राहुल गांधी यांनी माध्यमांतील वृत्त पोस्ट केले होते.
‘कोरोना विषाणू देशाच्या विविध भागांत पसरत असताना त्याविरुद्ध लढण्याची कोणतीही योजना सरकारकडे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत’, असे टष्ट्वीट राहुल गांधी यांनी केले होते.