नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (PM Garib Kalyan Anna Yojana) मोफत रेशन वाटप होळीच्या पुढेही वाढवण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) शनिवारी ही माहिती दिली. पीएमओने जारी केलेल्या निवेदनात पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, "या कोरोनाच्या काळात आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे की, कोणीही गरीब उपाशी राहू नये. त्यामुळे सध्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशनची मोहीम होळीच्या पुढेही वाढवण्यात आली आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenda Modi) यांच्या अध्यक्षतेखाली 24 नोव्हेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKAY) मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली, त्यानुसार या योजनेतील लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळेल.
अनुदानित धान्याव्यतिरिक्त मोफत रेशनप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 करोडहून अधिक लोकांना दरमहा 5 किलो मोफत गहू/तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला 1 किलो मोफत संपूर्ण हरभरा दिला जात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत, सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत (NFSA) 80 कोटी रेशन कार्डधारकांना मोफत रेशन पुरवठा केला जातो. लाभार्थ्यांना रेशन दुकानातून अनुदानित धान्याव्यतिरिक्त मोफत रेशन दिले जाते.
कोरोना संकट काळात योजनेची घोषणाकोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा करण्यात आली. सुरुवातीला, ही योजना एप्रिल-जून 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर कोरोना संकट कायम राहिल्याने ती आणखी पाच महिन्यांसाठी (जुलै-नोव्हेंबर 2020) वाढवण्यात आली होती.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा एकदा दोन महिन्यांसाठी (मे-जून 2021) लागू करण्यात आली आणि नंतर पाच महिन्यांसाठी (जुलै-नोव्हेंबर 2021) वाढवण्यात आली. आता पुन्हा ही योजना मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.