नवी दिल्ली - कांद्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. भाव वाढल्याने कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मात्र आता लवकरच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी सरकारकडे कांद्याचा साठा उपलब्ध आहे. नागरिकांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे लवकरच कांदा 24 रुपये किलोने मिळेल असं म्हटलं आहे. पासवान यांनी बुधवारी (25 सप्टेंबर) ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने त्रिपुराला 1850 टन, हरियाणाला 2000 टन आणि आंध्र प्रदेशला 960 टन कांदा तत्काळ स्वरुपात 15.59 रुपये या दराने पोहोचवला आहे. त्यामुळे ग्राहकांना 23.90 रुपये दराने कांद्याची विक्री केला जाणार आहे. तसेच दिल्ली सरकारने 28 सप्टेंबरपासून पाच दिवसांपासून प्रतिदिन 100 टन कांद्याची मागणी केली आहे. दिल्ली सरकारची ही मागणी लवकरच पूर्ण केली जाईल. तसेच ज्या राज्यांना कांद्याची जितकी गरज आहे. ती गरज केंद्र सरकारकडून पूर्ण केली जाईल, असं देखील पासवान यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारकडे कांद्याचा 46 हजार टन साठाकांद्याचे भाव भडकल्यानंतर केंद्र सरकारने भाव खाली आणण्यासाठी आमच्याकडे 46 हजार मेट्रिक टन कांद्याचा साठा असल्याचे सांगितले आहे. या शिवाय गरज भासल्यास साठ्याची मर्यादा ठरवून दिली जाईल, असेही म्हटले आहे. प्रश्न हा आहे की कांद्याचा पुरेसा साठा असताना आणि साठ्याची मर्यादा योजना असूनही भाव का भडकले? याचे कारण हे सांगितले जाते की गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांद्याचा योग्य भाव न मिळाल्यामुळे तो त्यांनी रस्त्यांवर फेकला होता. एका कांदा व्यापाऱ्याने तर आपला कांदा विकून आलेले पैसे पंतप्रधान निधीला पाठवले होते. येत्या 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहे. या परिस्थितीत साठवून ठेवलेला कांदा बाहेर काढून केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेऊ इच्छित नाही. परिणामी निवडणुकीत कांदा लोकांना रडवतो आहे. किरकोळ विक्रीत कांद्याचा भाव 70 ते 80 रूपये झाल्यामुळे लोक त्रासले आहेत.
केंद्र सरकार याबद्दल काय करणार असे विचारले असता केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले की, मदर डेअरी आणि नाफेड बूथ्सवर कांदा नियंत्रित दराने विकत आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत कांद्याच्या आवकीवर पाऊस, पुराचा परिणाम होत असतो. नोव्हेंबरअखेरपर्यंत मंडीत कांद्याचे नवे पीक आल्यावर भाव आपोआप नियंत्रित होतील. पासवान म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळतो आहे ही चांगली बाब आहे.