नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. याआधी केंद्र सरकारने कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. सरकारचे सहसचिव संजीव कुमार जिंदल यांनी अधिसूचना जारी करून याबाबत माहिती दिली.
संजीव कुमार जिंदल यांनी सांगितले की, "आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी होणारा खर्च देण्यात येईल. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली असेल तर त्या व्यक्तीचे विलगीकरण आणि तपास तसेच उपचारांवरील खर्च सरकार करेल. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ही मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून करण्यात येईल."
दरम्यान, संपूर्ण देशात आतापर्यंत 80 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 11 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. यात समावेश असलेल्या केरळातील 3 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे. याबाबतची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 65 भारतीय, 16 इटालीयन आणि एका कॅनाडाच्या नागरिकाचा समावेश आहे. यो कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या 4,000 हून अधिक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
चीनमधील कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.