नवी दिल्ली: मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणी मोठा गहजब झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता केंद्रातील मोदी सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक विधेयक आणत असून, हे विधेयक मंजूर झाले, तर अल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगणे गुन्हा मानला जाणार नाही, असे सांगितले जात आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर यासंदर्भातील मागणी पुढे आल्याचे सांगितले जात आहे. १० नोव्हेंबर रोजी पंतप्रधान कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणातील शिफारसींवर निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीला महसूल विभाग, गृह विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सामाजिक न्याय मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. नार्कोटिक्स ड्रग्ज सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) विधेयक, २०२१ अंतर्गत, अंमली पदार्थांचे वैयक्तिक सेवन गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर ठेवले जाईल. यासाठी १९८५ च्या कायद्यातील कलम १५, १७, १८, २०, २१ आणि २२ मध्ये सुधारणा केल्या जातील, असे सांगितले जात आहे.
विक्री करणे हा गुन्हा मानला जाईल
नार्को विधेयकात एखाद्या व्यक्तीने ड्रग्ज बाळगणे, खाजगीरित्या सेवन करणे आणि विक्री करणे यात फरक केला जाईल. यामध्ये विक्री करणे हा गुन्हा मानला जाईल, पण अत्यंत कमी प्रमाणात ड्रग्ज बाळगणे आणि वैयक्तिक वापर करणे हे गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढले जाईल. आर्यन खान प्रकरणात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कायद्यात बदल करण्याची मागणी केली होती आणि लोकांना सुधारण्याची संधी मिळायला हवी असे म्हटले होते.
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकार संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात कृषीविषयक कायदे मागे घेण्यासह एकूण २६ विधेयके मांडणार आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती आणि आता यासाठी संसदेत विधेयक सादर केले जाणार आहे.