केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, "कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार, परंतु..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 01:15 PM2021-03-07T13:15:15+5:302021-03-07T13:16:51+5:30
Farmers Protest : कृषी मंत्र्यांनी साधला विरोधकांवर निशाणा, शनिवारी शेतकरी आंदोलनाला पूर्ण झाले १०० दिवस
गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असून यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. शनिवारी पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायद्यांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. "जे लोकं याचा विरोध करत आहेत ते याबाबत अधिक माहिती मिळवत नाहीयेत असं दिसतंय. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. आम्ही कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार आहोत. परंतु कृषी कायद्यांमध्ये काही त्रुटी आहेत असं विरोधकांनी म्हणून नये. कारण कृषी कायद्यांमध्ये काय त्रुटी आहेत हे सकारात्मकरित्या सांगण्याच्या स्थितीत विरोधक नाहीत," असं म्हणत तोमर यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असल्या तरी त्यावर सकारात्मक तोडगा निघालेला नाही. या चर्चांमध्ये सरकारचं नेतृत्व कृषीमंत्री तोमर यांनीच केलं होतं. शनिवारी या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्तानं दिल्लीनजीकचा प्रमुख रस्ता बंद ठेवण्यात आला होता. "चर्चेदरम्यान कायद्यांमध्य काही सुधारणांबाबत वक्तव्य केलं. परंतु या सुधारणांचा अर्थ या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत असा नाही. या कायद्यात सुधारणांचा प्रस्ताव यासाठी ठेवला जात आहे कारण याच्या विरोधात नेतृत्व करणारा प्रमुख चेहरा शेतकऱ्यांचा आहे," असं तोमर म्हणाले.
यावेळी त्यांनी विरोधकांनाही धारेवर धरत त्यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. "संसदेतही आम्ही आमचं मत सर्वांच्या समोर ठेवलं. अनेक तास आम्ही दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांची बाजू ऐकली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतरही विरोधीपक्ष नेत्यांनी आंदोलनावरच चर्चा केली. कायद्याबाबत चर्चाच केली नाही," असं त्यांनी नमूद केलं.
केवळ आंदोलनाबाबतच चर्चा
"विरोधी पक्षाचे नेते प्रत्येक वेळी केवळ आंदोलनावरच चर्चा केली. कृषी कायद्यांबाबत त्यांनी कोणतीही चर्चा कली नाही, ज्याचा शेतकरी विरोध करत आहेत. लोकशाहीत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण राजकारण करण्यासाठी स्वतंत्र आहे. परंतु शेतकऱ्यांचं हित आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवून राजकारण करु नये. जेव्हा कोणताही बदल येतो तेव्हा तो लागू करणं कठिण आहे. काही लोकं त्याचा विरोध करतात. काही लोकांकडून त्याची मजाही केली जाते. जर त्या बदलांमागे उद्देश चांगला असेल तर लोकं तो स्वीकारही करतात," असं तोमर यांनी स्पष्ट केलं.