केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (CCPA) घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये बनावट उत्पादनांना आळा घालण्यासाठीच्या मोहिमेला आता वेग देण्याचं ठरवलं आहे. बनावट आय एस (IS Mark) चिन्हं असलेले प्रेशर कुकर (Pressure Cooker), दुचाकीसाठीचं हेल्मेट (Helmet) आणि घरगुती गॅस सिलिंडर (Cooking Gas Cylinder) विक्रेत्यांविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक अभियान सुरू केलं जाणार आहे. सीसीपीएनं याआधीच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना याबाबतची नोटीस जारी केली आहे.
'सीसीपीए'च्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-कॉमर्सवर अनेक विक्रेते आहेत की जे भारतीय मानक ब्युरोच्या मापदंडांची पूर्तता करत नाहीत आणि त्यांच्याकडून बनावट प्रेशर कुकरची विक्री सुरू आहे. भारतीय मानक ब्युरोच्या मापदंडांची पूर्तता न करणाऱ्या प्रेशक कुकरची विक्री सुरू असल्याबद्दल सीसीपीएनं पाच ई-कॉमर्स वेबसाइट्सना नोटिस धाडली आहे.
केवळ ऑनलाइनच नव्हे तर ऑफलाइन पद्धतीनं बाजारात विकल्या जाणाऱ्या बनावट घरगुती उत्पादनांच्या विक्रीवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. बनावट वस्तूंचा नायनाट करण्याविरोधातील देशव्यापी मोहिमेअंतर्गत प्रेशक कुकर, हेल्मेट आणि घरगुती गॅस सिलिंडर या तीन वस्तूंवर भर देत आहोत, असंही निधी खरे यांनी सांगितलं.
प्रत्येक जिल्हा पातळीवर बनावट उत्पादनांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी सीसीपीएनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ज्या कंपन्यांविरोधात तक्रारी आल्या आहेत त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी आपल्या अधिकाराअंतर्गत यात कारवाई करुन दोन महिन्यात याचा सविस्तर अहवाल देणार आहेत. याशिवाय बनावट उत्पादनांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी सर्व ई-कॉमर्स वेबसाइट्सवर नजर ठेवून असल्याचंही निधी खरे यांनी सांगितलं.
BIS चिन्ह असलेल्या वस्तू खरेदी करण्याचं आवाहनग्राहकांनी आपली आणि आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन बीआयएसचं भारतीय मानक मापदंडाचं चिन्ह असलेल्या वस्तू खरेदी कराव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. वेबसाइटवरुन खरेदी करतानाही ग्राहकांना वस्तूच्या फिचर्समध्ये आयएस चिन्ह पाहता येऊ शकतं. प्रेशर कुकर, हेल्मेट आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या विक्री आयएस चिन्हाशिवाय केली जाऊ शकत नाही. हेल्मेटवर बीआयएसचं ‘IS 4151:2015’ असं चिन्ह आणि प्रेशर कुकरवर ‘IS 2347:2017’ असं चिन्ह असणं गरजेचं आहे.