राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टात दिली आहे. त्यामुळे आता मुलींनाही राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टानं याआधीच्या सुनावणीवेळी एनडीएच्या प्रवेश परीक्षेत विद्यार्थिनींना परवानगी दिली जात नसल्यानं लष्कराला फटकारलं होतं. या परीक्षेसाठी आजवर मुलींना संधी नाकारण्यात येत होती. (Centre tells Supreme Court that a decision taken to allow induction of girls in National Defence Academy)
मुलींना एनडीएची प्रवेश परीक्षा देण्यासाठी संधी मिळावी, अशी विनंती करणारी याचिका कुश कार्ला यांनी कोर्टात केली होती. पात्रता असलेल्या मुलींना संधी नाकारून एनडीए राज्यघटनेच्या १४, १५, १६ व १९व्या कलमांचे उल्लंघन करीत आहे, असा आरोप याचिकेत केला होता. त्यावरील सुनावणीत कोर्टानं केंद्र सरकारला या प्रश्नी निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.
केव्हा होणार परीक्षा?मुलींना आता एनडीएमध्ये प्रवेश दिला जाईल हे सांगताना अतिशय आनंद होत आहे, असं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी सुप्रीम कोर्टात म्हणाल्या. सध्या सशस्त्र सेवेने महिलांना एनडीएमध्ये समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे आणि इतर मुद्द्यांचीही तपासणी केली जात आहे, असं त्या कोर्टात म्हणाल्या. केंद्र सरकारनं देशाच्या तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतल्याचं कोर्टात सांगण्यात आलं आहे.
येत्या नोव्हेंबर महिन्यात एनडीएची परीक्षा होणार आहे. २४ जून रोजी ही परीक्षा होणार होती. पण हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यानं परीक्षा नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थिनींना एनडीएमध्ये प्रवेश देण्यासाठी काही संरचनात्मक बदल करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी काही कालावधी लागणार आहे, असं केंद्र सरकारच्यावतीनं कोर्टात सांगण्यात आलं आहे.