देशातील काही राज्यांकडून सरसकट सर्व वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याची मागणी केली जात आहे. पण केंद्र सरकारकडून त्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. यामागचं नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावर आज केंद्र सरकारनं अधिकृतरित्या भूमिका स्पष्ट केली आहे. (Centre on why Covid vaccination isnt open to all yet)
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यामागचं कारण सांगितलं. देशात कुणाला लस हवीय यापेक्षा त्याची कुणाला जास्त गरज आहे या उद्देशातून लसीकरण सुरू आहे, अशी माहिती राजेश भूषण यांनी दिली आहे.
"अनेकांनी मला विचारलं की देशात सर्वच वयोगटातील नागरिकांना का लस दिली जात नाही. मूळात लसीकरणामागे आपली प्रमुख दोन उद्दीष्ट आहेत. मृत्यू रोखणं आणि आरोग्य यंत्रणेला सांभाळणं. त्यामुळे देशात कुणाला लस हवीय यापेक्षा लसीची कुणाला जास्त गरज आहे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून लसीकरण सुरू आहे", असं राजेश भूषण म्हणाले.
केंद्र सरकारनं देशात ४५ वर्ष वयोगटावरील सर्वांना लसीकरणाला परवानगी दिली आहे. पण याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे लसीकरणासाठी घालून देण्यात आलेली वयोमर्यादेची अट काढून टाकण्याची मागणी केली आहे. दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत एकूण ४३ लाख लोकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं यावेळी दिली. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. तर आतापर्यंत लस घेतलेल्यांची संख्या ८ कोटी ३१ लाखांपर्यंत पोहोचली आहे.