- हरिष गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गुजरातमधील झायडस कॅडिला या कंपनीने बनविलेल्या ‘व्हिराफिन’ या औषधाला कोरोनावर उपचारात आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, या औषधामुळे कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यावर अवलंबून राहण्याची कमी कमी गरज पडते तसेच रुग्ण कमी कालावधीत बरा होतो. देशात कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा नीटपणे होऊ शकत नसल्याने अभूतपूर्व संकटाची स्थिती आहे. अशावेळी ‘व्हिराफिन’मुळे मोठा दिलासा मिळू शकणार आहे. हे औषध मे महिन्यात उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे
झायडस कॅडिला कंपनीकडे दरवर्षी या औषधाच्या १० कोटी कुपींचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. हीच क्षमता कंपनी २४ कोटीपर्यंत वाढविण्याचा या विचारात आहे. कोरोनाविरोधात सध्या देशात कोविशिल्ड, कोवॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. या लसींच्या किमतीप्रमाणेच ‘व्हिराफिन’ची किंमत ठेवली जाईल. या दोन्ही लसींना जितके तापमान लागते तितकेच याला लागत असल्याने साठवणूक करण्यात काही अचडणी येणार नाहीत.
देशात सध्या नव्या रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्याही वाढताना दिसत आहे. या रुग्णांना उपचारासाठी बेड मिळवणे, औषधे उपलब्ध करुन देणे, गंभीर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करून देणे यात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. ‘व्हिराफिन’मुळे रुग्णांवर उपचार करण्याचा एक चांगला पर्याय आरोग्य कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध होऊ शकणार आहे. हीच गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
रुग्ण ७ दिवसांत कोरोना निगेटिव्ह झायडस कॅडिला कंपनीने म्हटले आहे की, ‘व्हिराफिन’ घेतल्यानंतर ९१.१५ रुग्णांची कोरोना चाचणी ७ दिवसात निगेटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण प्राथमिक अवस्थेत असताना हे औषध घेतल्यास रुग्ण लगेच बरा होतो व पुढे होणारे गंभीर परिणाम टाळता येतात. देशभरातील २० ते २५ केंद्रांवर याची चाचणी करण्यात आली. या औषधामुळे रुग्णांना श्वसनसाठी होणारा त्रास बऱ्याच अंशी कमी झाल्याचे दिसून आले आहे.