ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 24 - वर्षभरात चित्रपटगृहांमध्ये साधारणत: २०० ते ३०० चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र प्रत्यक्षात ‘सेन्सॉर’ मंडळाकडे केवळ इतक्याच चित्रपटांचे प्रमाणपत्र जारी करण्याचे काम नसते. वर्षभरात ‘सेन्सॉर’ने थोडथोडक्या नव्हे तर तब्बल १६ हजारांहून अधिक चित्रपट, लघुचित्रपटांना मान्यता दिली. यातील ८५० हून अधिक चित्रपट-लघुचित्रपटांना तर ‘ए’ प्रमाणपत्र होते. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘सेन्सॉर’ मंडळाकडे चित्रपटांना देण्यात येणा-या प्रमाणपत्रांसंदर्भात माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत ‘सेन्सॉर’ मंडळातर्फे ‘सेल्युलॉईड’, ‘व्हिडीओ’ व ‘डिजीटल’ प्रकारातील ‘फीचर फिल्म’ गटात मोडणारे भारतीय व विदेशी चित्रपट, भारतीय लघुचित्रपट, विदेशी लघुचित्रपट इत्यादींना प्रमाणपत्र जारी करण्यात आले. या कालावधीत ‘सेल्युलॉईड’ प्रकारात ८३, ‘व्हिडीओ’ प्रकारांत ६,६३२ प्रमाणपत्र जारी करण्यात आले. सर्वात जास्त ९,९०६ चित्रपट ‘डिजीटल’ प्रकारातील होते. ‘सेन्सॉर’तर्फे जारी करण्यात आलेल्या एकूण प्रमाणपत्रांची आकडेवारी १६,६२० इतकी होती.
‘सेन्सॉर’तर्फे चित्रपटांना ‘यू’, ‘यू/ए’, ‘ए’, व ‘एस’ अशी चार प्रमाणपत्रे देण्यात येतात. कुटुंबासह पाहता येणाºया चित्रपटांना ‘यू’ प्रमाणपत्र मिळते व या प्रमाणपत्रांची आकडेवारी १०,५६२ इतकी होती. पालकांच्या मार्गदर्शनात मुलांनी बघण्यासारख्या ‘यू/ए’ चित्रपटांची संख्या ५,१८३ होती तर १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी असलेल्या व ‘ए’ प्रमाणपत्र मिळालेल्या चित्रपटांची संख्या ८७५ इतकी होती. ‘ए’ दर्जाच्या चित्रपटांमध्ये ७६२ चित्रपट हे ‘डिजिटल’ होते. एकाही चित्रपटाला विशिष्ट समुदायासाठी असलेल्या चित्रपटांसाठी असणारे ‘एस’ प्रमाणपत्र मिळाले नाही.