शीलेश शर्मा
नवी दिल्ली : केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून, यामुळे राज्यात त्यांनी काँग्रेसच्या अडचणी वाढविल्या आहेत. तथापि, पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या जाण्याने फार काही फरक पडणार नाही. कारण त्यांना फार जनाधार प्राप्त नाही. ते केवळ ख्रिश्चन समुदायाच्या एका गटाचे नेतृत्व करतात.
उच्चपदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाको हे काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. केरळच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची डाव्या पक्षांसमवेत आघाडी आहे. शरद पवार व चाको यांच्यात तीन दशकांहून अधिक जुने संबंध आहेत. पवार यांनी काँग्रेस सोडून काँग्रेस एसची स्थापना केली होती, तेव्हा त्यांनी चाको यांना केरळ प्रदेशाध्यक्ष केले होते.चाको यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्यापूर्वी गंभीर आरोप केले आहेत. पक्षात गटबाजी वाढली आहे. ओमन चंडी व रमेश चन्नेथिला यांनी आपापले गट बनवून पक्षावर नियंत्रण मिळवले आहे. सोनिया गांधी यांना त्यांनी राजीनामा पाठवला असला, तरी त्यांनी तो अद्याप स्वीकारलेला नाही.पक्षाच्या सुत्रांचे म्हणणे आहे की, चाको त्यांच्या समर्थकांना तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, चंडी व चेन्नेथिला यांच्या गटाचा याला विरोध होता. पक्षात वेगळे पडलेले चाको उपेक्षेला वैतागले तेव्हा त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
भाजपमध्ये जाण्याचे फेटाळले वृत्तnचाको यांच्यासारख्या ख्रिश्चन चेहऱ्याला आपल्या पक्षात सहभागी करून घेण्यासाठी भाजपचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असे समजते. परंतु, चाको यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे.