नवी दिल्ली: प्रतिकूल परिस्थितीतही केवळ सातत्यपूर्ण व प्रामाणिक परिश्रमांच्या जोरावर यश मिळवता येते ही, प्रेरणा ‘‘छैनी के घाव’’ या पुस्तकाद्वारे मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.विश्वशांती केंद्र आळंदी आणि दिल्लीच्या नवभारत प्रकाशनाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण भवनाच्या सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.एस.एन.पठाण यांच्या ‘टाकीचे घाव’ या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या ‘हिंदी’ व ‘उर्दू’ अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले, उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव, डॉ. एस.एन. पठाण, आणि ‘छैनी के घाव’ या पुस्तकाचे अनुवादक प्रा.मनोज पांडे यावेळी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, गरीब कुटुंबात जन्माला येऊनही डॉ.एस.एन.पठाण यांचा राज्याच्या शिक्षण विभागाचे संचालक व नंतर नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदापर्यंतचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे. हाच जीवनप्रवास त्यांच्या ‘टाकीचे घाव’ या आत्मचिरत्रपर पुस्तकात आला आहे. आज याच पुस्तकाच्या ‘छैनी के घाव’ या हिंदी आणि ‘जर्बे संगतराश’ या उर्दू आवृत्तीमुळे देशातील तरूणांना प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)डॉ. पठाण यांनी आपल्या जडणघडणीत जन्मदात्या आईचे आणि गावातील सामाजिक समरसतापूर्ण वातावरणाचे योगदान विषद केले. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूपद भषवितांना घेतलेल्या काही ऐतिहासिक निर्णयाची माहितीही त्यांनी यावेळी दिली.लेखक तथा अनुवादक मनोज पांडे यांनीही पुस्तकाबाबत आपली भूमिका मांडली. ‘टाकीचे घाव’ या पुस्तकाचा ‘जर्बे संगतराश’ हा उर्दु अनुवाद मौलाना अब्दुल करीम पारेख ट्रस्टच्यावतीने करण्यात आला आहे.
‘‘छैनी के घाव’’ प्रेरणादायी
By admin | Published: October 01, 2015 10:24 PM