नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी सामाजिक कामांसाठी आपल्या एकूण संपत्तीतील 10 टक्के भाग म्हणजे तब्बल 7 हजार कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली आहे. या शिवाय त्यांनी ‘एअरटेल’ कंपनीतील आपले 3 टक्के शेअर्सही सामाजिक कामांच्या खर्चासाठी दिले आहेत. दुर्बल आणि वंचित समाज घटकांमधील तरुण-तरुणींना मोफत शिक्षण घेता यावं म्हणून ‘सत्य भारती विश्वविद्यापीठ’ स्थापन करण्याची घोषणाही सुनील मित्तल यांनी केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजातील वंचित विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण -‘सत्य भारती विश्वविद्यापीठ’ हे विश्वविद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी वाहिलेले असेल. 2021 साली विश्वविद्यापीठ सुरु करण्याचा मानस मित्तल यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतात हे विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजातील वंचित विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा उद्देश आहे. व्यवसायाच्या माध्यमातून समाजावर ठोस परिणाम व्हावा ही माहिती आधीपासून इच्छा आहे असं मित्तल म्हणाले. ‘भारती एअरटेल’ ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. 2007 साली सुनील मित्तल यांना भारतातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार अर्थात ‘पद्मभूषण’ने गौरवण्यात आले. 15 जून 2015 रोजी सुनील मित्तल यांनी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या चेअरमनपदी निवड झाली.यापूर्वी इन्फोसिसच्या नंदन नीलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी नीलेकणी यांनी आपली अर्धी संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करण्याची घोषणा केली आहे.
दानवीर मित्तल ! सुनिल मित्तल यांच्याकडून 7 हजार कोटी रुपये समाजकार्यासाठी दान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 12:53 PM