नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी कोविशील्डसह इतरही काही लसी टोचल्या जात आहेत. भारतात तयार करण्यात आलेल्या कोविशील्ड आणि कोव्हॅसीन, तसेच रशियन लस स्पुतनिक-व्ही यांच्या दोन डोसमधील अंतरासंदर्भात गेल्या अनेक दिसांपासून चर्चा सुरू आहे. विशेषत: कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर सरकार कमी करू शकते, असे बोलले जात आहे. मात्र, आता, अशी माहिती आली आहे, की या तीनही लसींच्या दोन डोसमधील अंतर बदलले जाणार नाही. (Chairman of the Covid-19 Working Group n k arora says no proposal for change in dose interval of covishield covaxin and sputnik v)
कोविड-19 वर्किंग ग्रुपचे चेअरमन डॉ. एन के अरोरा यांनी यासंदर्भात सांगितले, की नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप फॉर इम्यूनायझेशन (NTAGI) सातत्याने या लसींच्या प्रभावासंदर्भातील आकड्यांची समीक्षा करत आहे. सध्या एनटीएजीआयकडून कोविशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुतनिक-V या तिन्ही लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यासंदर्भात अथवा कमी करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही.
सध्या, कोव्हॅक्सीनचा पहिल्या डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवस आहे. कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. तसेच, रशियाच्या स्पुतनिक-व्ही, जी आता भारतातही तयार होत आहे, त्याच्या डोसमधील अंतरातही कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.