मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याच जिल्ह्यातील सिहोरमध्ये भाजपच्या एका आमदाराला उधारीसाठी अडवल्याची घटना घडली आहे. चहा विक्रेत्यानं 30 हजार रुपयांची उधारी थकवल्याचं चहा विक्रेत्याचं म्हणणं आहे. यावेळी त्यानं आमदारांना सुनावलंही. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ जिल्ह्यातील इछावर विधानसभा क्षेत्रातील बारखेडी गावातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील इछावर विधानसभेचे भाजप आमदार करण सिंह वर्मा एका कार्यक्रमासाठी बारखेडी गावात जात होते. त्याचवेळी एका चहा विक्रेत्याने काही लोकांसह आमदारांचा ताफा रस्त्याच्या मधोमध अडवला आणि चहाच्या 30 हजार रुपयांच्या उधारीची मागणी करण्यास सुरुवात केली. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार करण सिंह वर्मा यांच्या समर्थकांना चहा विक्रेत्याने चहा दिला होता. त्याचवेळी त्यांच्यावर 30 हजार रुपयांची उधारी झाली होती. आता तब्बल ४ वर्षांनंतर आमदार वर्मा एका कार्यक्रमानिमित्त त्या भागात गेले असता चहा विक्रेत्याने त्यांना पैशाची आठवण करून दिली.
व्हायरल व्हिडीओनुसार आमदार आपल्या समर्थकांसह कारमध्ये बसलेले आहेत. तर काही लोक त्यांच्या कारला घेरून उभे असल्याचं दिसत आहे. त्यात एक व्यक्ती आमदार पैसे देत नाहीयेत, आता खूप दिवस झाले. 4 वर्षे होऊन गेली. गरीब चहावाल्याचे पैसे देत नाहीयेत, असं त्यात ऐकू येत आहे. यावर आमदारांनीही आपण ते पैसे दिल्याची प्रतिक्रिया दिली. तेव्हाच चहा विक्रेता म्हणतो, “तुम्ही म्हणाला होता बेटा चहा बनव, काही समस्या आली तर मी आहे. मी तुमच्याकडे कितीतरी वेळा येऊन गेलोय.” यावर ते परवा ये असं उत्तर देताना दिसतायत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आमदार म्हणाले…“मला माहित नाही केव्हाचे पैसे आहेत. तो तरूण मला ब्लॅकमेल करतोय. त्याला दोन वेळा 30 हजार रुपये कार्यकर्त्यांनी दिले आहेत. कालही त्याला 30 हजार रुपये देण्यात आले. निवडणुकांच्या काळात असले व्हिडीओ काढले जात आहेत,” असं वर्मा यांनी आजतकशी बोलताना सांगितलं.