आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 08:03 AM2024-05-12T08:03:40+5:302024-05-12T08:05:20+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेचे निमंत्रण स्वीकारले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेचे निमंत्रण स्वीकारले आहे. मी पंतप्रधानांसोबत समोरासमोर चर्चेस तयार असल्याचे राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी. लोकुर, अजित शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांच्या पत्राला उत्तर देताना सांगितले.
राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर एक पाेस्ट शेअर करुन सांगितले की, मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी या विषयावर बोललो होतो. त्यांनीही जनतेच्या प्रश्नावर चर्चा व्हायला हवी, असे मला सांगितले. राजीकय पक्ष निवडणूक लढतात. त्यांच्या नेत्यांना थेट ऐकण्याचा जनतेचा हक्क आहे. जर पंतप्रधान तयार झाले तर मी स्वत: किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या चर्चेत जरूर सामील होतील. माजी न्यायाधीश मदन बी. लाेकूर, माजी न्यायाधीश अजित शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चर्चेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले होते.