अहमदाबाद : गुजरातमध्ये प्राबल्य असलेल्या पाटीदार पटेल समुदायाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पटेल या २३ वर्षीय तरुणाने गुजरात सरकारची झोप उडविली आहे. पटेल समाजाला ओबीसीचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी मंगळवारी महा क्रांती रॅली आयोजित केली असून त्यांना ‘प्रतिमोदी’ संबोधत मिळत असलेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे आनंदीबेन पटेल यांच्या सरकारसमोर जबर आव्हान उभे ठाकले आहे.अहमदाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर नेल्या जाणाऱ्या या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पटेल यांनी अहमदाबाद बंदचे आवाहन केले आहे. २५ आॅगस्ट रोजी आम्हाला शांततेत रॅली पार पाडायची आहे; मात्र राज्य सरकार किंवा पोलिसांनी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही शांत बसणार नाही. हिंसाचार झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा हार्दिक पटेल यांनी दिला आहे. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणसंस्थांमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पटेल यांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. २५ लाखांची गर्दी अपेक्षित हार्दिक पटेल यांच्या आजवरच्या सभांना पाच लाखांवर लोकांनी हजेरी लावली होती. प्रस्तावित रॅलीला राज्यभरातील सुमारे २५ लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा पटेल यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)कोण आहेत हे प्रतिमोदी?अहमदाबादपासून ८० कि.मी. अंतरावरील वीरमगाम तालुक्यातील चंद्रनगरचा रहिवासी असलेल्या हार्दिक यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळविली असून सेवादलातून बाहेर पडल्यानंतर सरदार पटेल सेवादलाची स्थापना केली. मेहसाना येथे पटेल समुदायाच्या मागणीसाठी त्यांनी घेतलेल्या छोट्याशा सभेला व्यापक आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुरतमधील त्यांच्या सभेला पाच लाखांवर लोकांनी गर्दी केली होती. त्यांनी १२ जिल्ह्यांचा दौरा केला असून दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत आहे. हार्दिक पटेल यांना नवा मोदी संबोधले जाते. कधी त्यांची तुलना लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केली जात आहे.