लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विशेष सीबीआय न्यायालयाने गेल्या आठवड्यात सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातून गुजरातचे माजी एटीएसप्रमुख डी. जी. वंजारा, राजस्थानचे आयपीएस अधिकारी दिनेश एम. एन. यांची आरोपमुक्तता केली. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला सोहराबुद्दीनचे भाऊ रुबाबुद्दीन यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.डी.जी. वंजारा व दिनेश एम. एन. यांच्याविरुद्ध सकृतदर्शनी काहीच पुरावे नसल्याचे म्हणत, विशेष सीबीआय न्यायालयाने या दोघांचीही गेल्याच आठवड्यात आरोपमुक्तता केली. या निर्णयामुळे सीबीआयला मोठा झटका बसला.रुबाबुद्दीन यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, सोहराबुद्दीनचे अपहरण करून त्याला व त्याच्याबरोबर असलेल्या तुलसीदास प्रजापतीला बेकायदेशीरपणे ताब्यात घेत, त्यांची बनावट चकमकीत हत्या केल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे तपासयंत्रणेकडे आहेत. तर सीबीआयच्या म्हणण्यानुसार, सहिराबुद्दीन व त्याची पत्नी कौसर बी यांना हैदराबादहून सांगली येथेयेत असताना गुजरात एटीएसने ताब्यात घेतले.नोव्हेंबर २००५मध्ये गुजरातमधील गांधीनगर येथे बनावट चकमक करत, शेखची हत्या करण्यात आली. त्यानंतर शेखची पत्नीही गायब झाली. तिचीही हत्या करण्यात आली. शेखचा साथीदार व या बनावट चकमकीचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तुलसीदास प्रजापती याचीही डिसेंबर २००६मध्ये हत्या करण्यात आली. रुबाबुद्दीन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
वंजारांच्या आरोपमुक्ततेला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 5:08 AM