नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत घसरणीला लागलेला कोरोनाचा आलेख पुन्हा डोके वर काढू लागला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ९० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे, ही दिलासादायक बाब. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागले आहे कोरोना प्रतिबंधक लस आणि लसीकरण मोहिमेकडे. सरकारने लसीकरण मोहिमेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.
देशाची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येकाला पुरेशा प्रमाणात लस मिळेल यासाठी केंद्र व राज्य सरकारांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. केंद्राने त्यानुसार समन्वय समित्यांची स्थापना करण्याचे निर्देशही दिले आहेत. एकही व्यक्ती प्रतिबंधक लसीविना राहू नये यासाठी एकूण २६० कोटी मात्रांची आवश्यकता भासणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मात्रा उपलब्ध होणे अशक्य आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत किमान ४० ते ५० कोटी मात्रा मिळतील, या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे. लसीचा साठ्यासाठी लागणारी शीतगृहे, कुप्या, वाहतूक इत्यादी घटकही या मोहिमेत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.