इस्लामाबाद : अतिरेक्यांनी भारतात केलेला हल्ला म्हणजे उभय देशांतील चर्चेपुढील मोठे आव्हान आहे, असे मत पाकिस्तानातील मीडियाने व्यक्त केले आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनने पहिल्या पानावर दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बंदूकधारींनी भारतात हवाईदलाच्या तळावर केला खुल्लमखुल्ला हल्ला. तथापि, या दोन देशांत जवळपास मृतवत झालेली चर्चा नव्याने सुरू करण्याच्या प्रयत्नातील हा खोडा ठरू शकतो, असेही वृत्तात म्हटले आहे. द न्यूज इंटरनॅशनलने म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला पाकिस्तान दौरा आणि उभय नेत्यांची भेट यानंतर एका आठवड्यातच हा हल्ला झाला आहे. मोदींचा हा दौरा म्हणजे द्विपक्षीय चर्चेच्या दिशेने उचललेले एक पाऊल होते. अण्वस्त्रक्षमतेने सज्ज असलेल्या या दोन्ही देशांतील चर्चेला यापूर्वीही अशा घटनांतून अडथळे आणले गेलेले आहेत. दरम्यान, पाकिस्तानातील अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे, तर या घटनेनंतरही दोन देशांत चांंगली चर्चा होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हे तर भारत-पाक चर्चेपुढील आव्हान
By admin | Published: January 04, 2016 2:53 AM