तिरूवनंतपूरम : काँग्रेसचे ‘हाय प्रोफाइल’ नेते शशी थरुर यांना यंदा विजयासाठी तिरूवनंतपूरच्या लढाईत फारच कष्ट घ्यावे लागणार आहेत. भाजपसह डाव्यांनीही थरुर यांच्याविरोधात रण तापवल्याने ही जागा राखण्यासाठी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दोनवेळा येथून विजयी झालेले ६३ वर्षीय थरुर येथून पुन्हा लढत आहेत. काँग्रेससाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला जातो. मात्र, काँग्रेसची ही जागा हिसकावून घेण्यासाठी भाजप व डाव्या पक्षांनीही जोरदार व्यूहरचना आखली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा घाम काढणाऱ्या भाजपने यंदा कुम्मनम राजशेखरन यांना, तर डाव्यांनी येथे सी. दिवाकरन यांना उमेदवारी दिली आहे. सुमारे ६७ टक्के हिंदू मतदार असलेल्या मतदारसंघात जातीय समीकरणेही महत्त्वाची आहेत. तसेच १९ टक्के ख्रिश्चन व १४ टक्के मुस्लीम मतदारांचा कौलही निर्णायक ठरू शकतो. येथील ७२ टक्के मतदार शहरी व २८ टक्के मतदार ग्रामीण आहेत. या मतदारसंघात महिला मतदार अधिक आहेत.
संयुक्त राष्ट्रांमध्ये महासचिव राहिलेले थरुर काँग्रेसमधील सर्वात उच्चशिक्षित, बुध्दिवंत नेते मानले जातात. काँग्रेसच्या कार्यकाळात परराष्ट्र, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद म्हणून थरुर यांनी चांगली छाप पाडली. थरुर यांची लोकसभेतील उपस्थिती ८६ टक्के होती आणि त्यांनी ४४६ विचारले. थरुर यांनी २००९ मध्ये विजयी होताना सुमारे १ लाखाचे मताधिक्य मिळवले होते, पण त्यांना २०१४ साली विजयासाठी झगडावे लागले होते.