राफेलवर खुल्या चर्चेचे मोदींना आव्हान, काँग्रेसचा थेट हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 04:24 AM2018-08-16T04:24:44+5:302018-08-16T07:08:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण पोकळ असल्याचे सांगत काँग्रेसने मोदींना राफेल सौद्यासह अन्य मुद्द्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण पोकळ असल्याचे सांगत काँग्रेसने मोदींना राफेल सौद्यासह अन्य मुद्द्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे.
हिंमत असेल तर मोदींनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे आव्हान स्वीकारत राफेल, व्यापमं घोटाळा आणि अन्य भ्रष्टाचारासह देशाच्या अर्थव्यवस्थेची घसरण, रुपयाचे अवमूल्यन, चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण झालेला धोका, देशात निर्माण झालेले वैमनस्याचे वातावरण या मुद्द्यांवर खुल्या व्यासपीठावर चर्चा करावी, असे काँग्रेसने स्पष्ट केले. मोदी स्वातंत्र्याबाबत बोलत आहेत. दगडावर रेष ओढण्याची भाषा करीत आहेत, मात्र बेरोजगारी, गरिबी, विषमतेपासून स्वातंत्र्य मिळाले काय, द्वेषापासून स्वातंत्र्य मिळाले काय? मोदींनी दिलेली आश्वासने पोकळ असून घोषणाही पोकळ आहेत. २०१३मध्ये मोदींनी लाल किल्ल्याचे क्लोन तयार करून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आव्हान दिले होते. आज काँग्रेसने तशाच प्रकारे आव्हान दिले आहे. निवडणूक जुमल्याच्या नावावर दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. त्याबाबत काँग्रेसला उत्तर हवे आहे. देशभरात जात, धर्म, प्रदेशवाद निर्माण केला जात आहे. अन्न, वस्त्र तसेच भाषेच्या नावावर जनतेत द्वेषभावना पेरली जात आहे, मात्र त्याबाबत मोदी लाल किल्ल्यावरील भाषणात एक शब्दही बोलले नाहीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सूरजेवाला यांनी म्हटले.
मोदी सरकारने एकदा तरी सत्य बोलावे, कारण अच्छे दिन आले नाही. मोदी पंतप्रधानपदावरून हटतील तेव्हाच सच्चे आणि अच्छे दिन येतील, असे काँग्रेसला वाटते, या शब्दांत सूरजेवाला यांनी टोला हाणला.
हे तर निवडणुकीचे भाषण - मायावती
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण राजकीय शैलीतील निवडणुकीचे भाषण असल्याची टीका बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. मोदींच्या लांबलचक भाषणातून १२५ कोटींची लोकसंख्या असलेल्या भारताला कोणतीही ऊर्जा किंवा नवी आशा मिळालेली नाही.
सर्वसामान्यांना जीव-मालमत्ता आणि धर्माची सुरक्षा हवी आहे. त्याबाबत महत्त्वपूर्ण अशी संवैधानिक हमी देण्याचे आश्वासन देण्याचे स्मरणही त्यांना राहिले नाही. खरेतर, अशा प्रकारची हमी हीच प्रथम क्रमांकाची गरज बनली आहे, असे त्या म्हणाल्या. सरकारचे उत्तरदायित्व निश्चित व्हावे. दिलेल्या आश्वासनांची सत्यतेची कसोटी घेतली जावी, यासाठी मोदींनी असे राजकीय भाषण संसदेत द्यायला हवे होते, असे त्या एका निवेदनात म्हणाल्या.
राहुल गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी ७२व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात राष्टÑध्वज फडकविला आणि तेथे गोळा झालेल्या मुलांना मिठाई वाटली. या कार्यक्रमाला सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा, संघटन सरचिटणीस अशोक गहलोत, अहमद पटेल, मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला, सेवादलाचे मुख्य संघटक लालजी भाई देसाई आणि अन्य नेते उपस्थित होते.
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवरून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना माझ्या शुभेच्छा! देश ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना देशवासीय देशभक्तीच्या भावनेत रंगून गेले आहेत, असे टिष्ट्वट त्यांनी केले.