ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक करुन दाखवण्याचे निवडणूक आयोगाने दिलेले आव्हान फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने स्विकारले आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक होऊ शकते असा दावा करणारा आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने हे आव्हान स्विकारण्यास नकार दिला. त्यांनी नियम बदलण्याची मागणी केली होती. पण निवडणूक आयोगाने त्याची मागणी फेटाळून लावली.
फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हानाला प्रतिसाद दिला असून, येत्या 3 जून रोजी त्यांना ईव्हीएम मशीन हॅक करुन दाखवावी लागेल. सीपीआय, बीजेडी, सीपीआय(एम) आणि आरएलडी हे पक्ष तिथे उपस्थित हॅकिंग शक्य आहे का ? त्याचे निरीक्षण करतील. मागच्या काही काळापासून प्रत्येक निवडणुकीत सातत्याने भाजपाचा विजय होत असल्याने काही पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर संशय व्यक्त केला होता.
दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पार्टीने ईव्हीएम मशीनशी छेडछाड झाल्याचा आरोप केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीयांची बैठक घेऊन ईव्हीएममशीनशी छेडछाड शक्य नसल्याचे सांगितले. भारतात वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूर्णपणे निर्धोक आहेत व त्यांत कोणतीही हेराफेरी केली जाऊ शकत नाही, अशी ग्वाही निवडणूक आयोगाने दिली आणि तरीही विश्वास नसेल, तर ‘या आणि आमची मतदान यंत्रे हॅक करून दाखवा,’ असे खुले आव्हान राजकीय पक्षांना दिले.
येत्या ३ जूनपासून आयोगाची मतदान यंत्रे हॅक करून दाखविण्यासाठी उपलब्ध असतील. यासाठी इच्छुक राजकीय पक्षांना येत्या २६ मे रोजी सायंकाळी ५ पर्यंत नोंदणी करण्याची वेळ होती. नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांचे प्रत्येकी ३ प्रतिनिधी यात भाग घेऊ शकतील. हे प्रतिनिधी त्यांच्या पसंतीची कोणतीही ४ मतदान यंत्रे हॅक करून दाखविण्यासाठी निवडू शकतील असे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नस्सीम झैदी यांनी सांगितले होते.