नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील सर्वात ताकदवान, भ्रष्ट आणि हुकूमशाहीवादी शक्तींना आव्हान दिले आहे, अशा शब्दात ‘केजरीवाल को आशीर्वाद’ या मोहिमेची घोषणा करताना सुनीता केजरीवाल यांनी भाजपवर हल्ला चढविला.केजरीवाल खरे देशभक्त आहेत. न्यायालयात ज्या पद्धतीने त्यांनी बाजू मांडली त्यासाठी हिंमत लागते. अशाच पद्धतीने आमच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी इंग्रजांचा सामना केला होता, असे सुनीता म्हणाल्या. केजरीवाल यांच्या लढाईत सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
आता संयुक्त राष्ट्रसंघाचीही टिप्पणी केजरीवाल यांना करण्यात आलेल्या अटकेच्या मुद्यावरून आता जर्मनी आणि अमेरिकेपाठोपाठ संयुक्त राष्ट्रसंघानेही टिप्पणी केली आहे.भारत आणि अन्य देशांमध्ये प्रत्येकाचे अधिकार सुरक्षित राहून प्रत्येकाला स्वतंत्र आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करता येईल, अशी आशा केजरीवाल यांची अटक आणि काँग्रेसची बँक खाती गोठविण्याच्या मुद्यावर बोलताना संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. केजरीवाल यांच्या संबंधात केलेल्या जर्मनी आणि अमेरिकेच्या टिप्पणीवर भारताने तीव्र आक्षेप नोंदवत भारतातील घडामोडींवर नाक खुपसू नये असे म्हटले होते.
‘राबडी देवींप्रमाणेच तयारीत आहेत’केजरीवाल यांनी पक्षातील आपले सहकारी सोडून दिले असून आता सौ. केजरीवाल राबडीदेवींप्रमाणे मुख्यमंत्रिपद सांभाळण्यासाठी सज्ज होत असताना दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली आहे. सुनीता केजरीवाल यांनी गेल्या सात दिवसात केलेल्या तिसऱ्या आभासी संबोधनावर ते भाष्य करीत होते.