नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये ऐक्याचा विश्वास निर्माण करायचा असेल, तर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार या तिन्ही चेहऱ्यांना विरोधकांचे नेतृत्व करावे लागेल. हे समीकरण जमले, तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणे शक्य आहे, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
भाजपच्या बलाढ्य निवडणूक यंत्रणेला धूळ चारून कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने नोंदविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर विरोधी पक्षांमध्ये उत्साह आहे, शनिवारी कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या सरकारच्या शपथविधीला हजेरी लावणाऱ्या विरोधी नेत्यांच्या यादीवरून स्पष्ट होणार आहे.
जिथे सोनिया गांधींचा प्रभाव अपुरा ठरतो, तिथे समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार आणि नितीशकुमार यांचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी सोनिया गांधींबरोबर पवार आणि नितीशकुमार यांनाही सन्मानाचे पद दिले, तरच विरोधक एकजूट झाल्याचा गंभीर संदेश जनतेत जाऊ शकेल.
पवार-नितीशकुमार का महत्त्वाचे?शरद पवार आणि नितीशकुमार यांच्यात काँग्रेसच्या आवाक्याबाहेर असलेल्या यूपीएबाहेरच्या पक्षांना आकृष्ट करण्याची क्षमता आहे. विरोधी ऐक्य साधण्यासाठी काँग्रेसला प्रसंगी पंतप्रधानपदावरील दावा सोडून आणि राजकीय महत्त्वाकांक्षांना आवर घालून विरोधकांशी समझोता करावा लागणार आहे. त्यासाठी शरद पवार आणि नितीशकुमार यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरणार आहे.