देशातील सर्वात तरुण खासदार म्हणून चर्चेत आलेले आणि भाजपात वेगळी ओळख निर्माण करणारे भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय़ अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांना भाजपानेच धक्का दिला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या यादीतून तेजस्वी यांना वगळण्यात आले आहे. अशाप्रकारे स्वत: च्याच राज्यातून नाव गायब होणे हे तेजस्वींसाठी पक्षाने दिलेला एक मोठा संदेश असल्याचे मानले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी तेजस्वी सूर्या यांनी हवेत असलेल्या विमानाचा इमरजन्सी दरवाजा उघडण्याची चूक केली होती. यामुळे विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. यामुळे कदाचित पक्षाने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून दूर ठेवले असावे असा कयास बांधला जात आहे. याच तेजस्वी यांनी पश्चिम बंगालमध्ये ममतांना पाणी पाजण्याचे ठरविले होते. बंगालच्या निवडणुकीत ममतांच्या चिंता वाढविल्या होत्या. परंतू कर्नाटकात त्यांना विचारात घेतले नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेसला आयतीच संधी मिळाली...तेजस्वी सूर्या यांना प्रचारकांच्या यादीत न घेतल्याने काँग्रेसला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. त्यांच्याच घरची ही परिस्थिती असताना त्यांचे पक्षात काय महत्त्व उरले आहे, हे समजून घेतले पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. तर काँग्रेसला ज्ञान वाटत फिरणाऱ्या नफरती चिंटूला भाजपाने ‘इमरजेंसी exit’ दाखविल्याचे, काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे.
भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी तयार पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्र्यांच्या मजबूत टीमचा समावेश आहे. पक्षाने जाहीर केलेल्या नेत्यांच्या यादीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया आणि प्रल्हाद जोशी यांचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय मध्य प्रदेश आणि आसामचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि हिमंता बिस्वा सरमा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सीएम बसवराज बोम्मई, कर्नाटक भाजपचे प्रबळ नेते बीएस येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री डीव्ही सदानंद गौडा, कर्नाटकातील काही मंत्री आणि राज्यातील पक्षाच्या नेत्यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.