इस्लामाबाद : मुंबईवरील २००८ च्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार झकी उर रेहमान लख्वी याने अपहरणाच्या आरोपाखाली पुन्हा झालेल्या अटकेला आव्हान दिले आहे. पाकिस्तानातील सत्र न्यायालयात लख्वीने अर्ज दिला असून, आपल्याला खोट्या व कपोलकल्पित आरोपाखाली अटक केली असल्याची तक्रार केली आहे. लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी ही माहिती दिली आहे. अपहरण करण्यात आलेली व्यक्ती बनावट आहे. सरकारने ही खोटी स्टोरी बनवून माझ्या क्लाएंटला गजाआड ठेवले आहे. सरकार भारताच्या दबावाखाली हे कृत्य करीत असल्याचा आरोप राजा रिझवान यांनी ठेवला आहे. मंगळवारी लख्वीची सुटका होणार असताना त्याला मुहम्मद अन्वर खान या अफगाण व्यक्तीचे अपहरण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. यासंदर्भातील एफआयआर सोमवारी इस्लामाबाद येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अन्वर खान याने आपले अपहरण सहा वर्षांपूर्वी लख्वीने केले असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी न्यायादंडाधिकाऱ्यांकडून लख्वीची दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे. लख्वी (५४) याला मुंबई हल्ल्याच्या प्रकरणात १८ डिसेंबर रोजी जामीन देण्यात आला होता; पण त्यावेळी सरकारने त्याला सार्वजनिक सुरक्षेच्या आरोपाखाली अटक केली. लख्वीने या अटकेला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयात सरकारची बाजू टिकली नाही. लख्वी सध्या शालिमार पोलीस ठाण्यात आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाईल. (वृत्तसंस्था)
लख्वीकडून पुन्हा अटकेला आव्हान
By admin | Published: January 01, 2015 3:22 AM