ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - अवकाश संशोधनात विक्रमी झेप घेणा-या भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने आजवर अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. समस्त भारतीयांनाही इस्त्रोच्या या कामगिरीचा अभिमान आहे. पण उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपग्रहाला अवकाश कक्षेत स्थिर करुन इस्त्रोची जबाबदारी संपत नाही. भारताप्रमाणेच जगातील अनेक देश आपले उपग्रह अवकाशात पाठवत असतात. त्यातून मोठया प्रमाणावर अवकाश कचरा तयार होतो. त्या कच-यापासून आपल्या उपग्रहाचे रक्षण करण्याची जबाबदारी इस्त्रोवर असते.
उपग्रह अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर तो कार्यान्वित करण्याचे इस्त्रोचे मुख्य उद्दिष्टय असते तसेच अवकाश कच-यापासून आपल्या उपग्रहाला वाचवण्याचे सुद्धा इस्त्रोसमोर आव्हान असते. प्रत्येक उपग्रहाला एक ठराविक वर्षांचे आयुष्य असते. तितकीवर्ष तो उपग्रह कार्यान्वित राहतो. त्यानंतर निरुपयोगी बनलेला हा उपग्रह स्पेस डेब्रिस म्हणजे कचरा ठरतो. असेच बंद पडलेले उपग्रह, रॉकेटचे भाग, उपग्रहाचे तुकडे हा अवकाशात फिरणारा कचरा असतो.
आणखी वाचा
ताशी 30 हजार किमी वेगाने फिरणारा हा कचरा खूप धोकादायक असतो. एखादा छोटासा तुकडाही उपग्रह, अवकाश यान आणि अवकाश तळाचे नुकसान करण्यास पुरेसा ठरतो. अवकाशातील आपल्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी इस्त्रोनेही वेगवेगळया पद्धती अवलंबल्या आहेत. या अवकाश कच-यावर मार्ग काढण्यासाठी IADC ही अवकाश कचरा समन्वय समिती आहे. इस्त्रो या समितीचा सदस्य आहे. अवकाश कचरा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच सदस्य देशांना अवकाश कच-यांची माहिती देणे हे या आयएडीसीचे मुख्य उद्दिष्टय आहे.
अवकाश कच-यामुळे जेव्हा एखाद्या देशाच्या उपग्रहाला धोका निर्माण होतो तेव्हा आयएडीसीकडून त्या देशाला पूर्वसूचना दिली जाते अशी माहिती अहमदाबाद येथील इस्त्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांनी सांगितले. अवकाशातील कच-याच्या धोक्याची आगाऊ सूचना मिळावी यासाठी इस्त्रोने एमओटीआर हे स्वत:चे रडार विकसित केले आहे. 2015 पासून हे रडार कार्यान्वित आहे. एकाचवेळी 30 सेंटीमीटरपर्यंतच्या दहा वस्तू 800 किलोमीटर अंतरावर असताना टिपण्याची क्षमता या रडारमध्ये आहे. 50 सेंटीमीटरपर्यंतची वस्तू असेल तर हे रडार 1हजार किलोमीटर अंतरावर असताना माहिती देते.
एकाचवेळी अनेक उपग्रह प्रक्षेपित करुन अवकाशातील हा कचरा कमी करता येतो. इस्त्रो एकाचवेळी अनेक उपग्रह प्रक्षेपित करुन हा कचरा कमी करण्यामध्ये हातभार लावत आहे. भारत आज PSLV-C38 या रॉकेटव्दारे कार्टोसॅटसह 30 नॅनो उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.