ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक करुन दाखवण्यासाठी शनिवारी झालेल्या हॅकेथॉन चॅलेंजमध्ये एकही पक्ष सहभागी झाला नाही. हे आव्हान स्विकारण्याची तयारी दाखवणा-या सीपीएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्यक्षात मशीन हॅक करण्याचे चॅलेंज स्विकारलेच नाही. आपल्याला चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचे नसून, ईव्हीएमची कार्यपद्धती समजून घ्यायची आहे असे या दोन्ही पक्षांनी सांगितले.
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी ही माहिती दिली. ईव्हीएमचे कार्य कसे चालते ते प्रात्यक्षिकासह दाखवल्यानंतर सीपीएमचे समाधान झाले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक होऊ शकते असा दावा करणारा आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने हे आव्हान स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांनी नियम बदलण्याची मागणी केली होती. पण निवडणूक आयोगाने त्याची मागणी फेटाळून लावली.
मागच्या काही काळापासून प्रत्येक निवडणुकीत सातत्याने भाजपाचा विजय होत असल्याने काही पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर संशय व्यक्त केला होता. दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पार्टीने ईव्हीएमसोबत छेडछाड झाल्याचा आरोप केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीयांची बैठक घेऊन ईव्हीएममध्ये छेडछाड करणं शक्य नसल्याचे सांगितले.
भारतात वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूर्णपणे सुरक्षित आहेत व त्यात कोणतीही छेडछाड केली जाऊ शकत नाही, अशी ग्वाही निवडणूक आयोगाने दिली आणि तरीही विश्वास नसेल, तर ‘या आणि आमची मतदान यंत्रे हॅक करून दाखवा,’ असे आव्हान राजकीय पक्षांना दिले होते. इच्छुक राजकीय पक्षांना २६ मे रोजी सायंकाळी ५ पर्यंत नोंदणी करण्याची वेळ होती. नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांच्या प्रत्येकी ३ प्रतिनिधींना यात भाग घेण्याची मुभा होती. या प्रतिनिधींना त्यांच्या पसंतीची कोणतीही ४ मतदान यंत्रे हॅक करून दाखवण्यासाठी निवडता येणार होती असे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नस्सीम झैदी यांनी सांगितले होते.
काय म्हणतो निवडणूक आयोग?
- मतदान यंत्राचा कोणत्याही पक्षाच्या बाजूने अगर विरोधात वापर केला जाऊ शकत नाही. ईव्हीएम बनविताना किंवा मतदानासाठी त्यांचा वापर करताना हेराफेरी शक्य नाही. ही यंत्रे परदेशातून आयात केली जात नाहीत. सर्व यंत्रे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सार्वजनिक उपक्रमांकडून घेतो. त्याचे सॉफ्टवेअरही येथेच तयार केले जाते.
- मतदानापूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमची तपासणी होते. ईव्हीएममध्ये दोष आहे किंवा काय, हे तपासण्यासाठी मतदानाची रंगीत तालीम घेण्यात येते. ही प्रक्रिया आटोपल्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोरच ईव्हीएम सील केले जाते. सर्व यंत्रे स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात येतात.